शिरी कफन बांधून!


शिरी कफन बांधून!- विवेक मोरे
मो. ८४५१९३२४१०

गात्रागात्रातून शब्दांचे अंगार फुलवीत..
मेश्राम सर आपल्या चिरक्या आवाजात मला कविता म्हणावयास पाचारण करतात.
मी कवितापिठावर जाऊन कवितेला सुरुवात करतो,
अन् का कुणास ठाऊक……?
प्रेक्षकात बसलेला धुरंधर आपल्या रुपेरी दाढीवरुन हात फिरवत मिश्किलपणे हसतो.
हसताना नकळत त्याचा तांबूस दात दर्शन देऊन जातो.
मला आठवत राहतो त्याचा एक जखम पक्षी जगतानाचा तडफडाट.
त्यासरशी मी आणखीन तडफेने माझी कविता पुढे वाचत राहतो……,
आणि पुना मसाला चघळत शब्दाशब्दाला उस्फूर्तपणे दाद देणारा शिवा इंगोले माझं लक्ष वेधून घेतो.
‘मी झेंडावंदन केले तो दिवस काळा होता!’
या ओळीचा गजर माझ्या मस्तकात घुमत राहतो…..,
आणि तरीही मी माझी कविता वाचत राहतो.
इतक्यात कोपर्‍यातून कोणितरी दाद देतं,
ज. वि. आहेत हे ध्यानात येतं.
“हे ही तसे बरे झाले, तुरुंगाच्या बाहेर सुरुंग पेरता आले!”
या आठवणीसरशी माझे शब्द सुध्दा सुरुंग बनू लागतात.
मध्यभागी बसलेला बबनसुध्दा किलकिल्या डोळ्याने माझ्याकडे बघत असतो.
“स्वातंत्र्या, स्वातंत्र्या एकदा तुझी व्याख्या तरी मांड, नायतर तुझ्या आयची……”
ही त्याची अग्नीरेखा आठवते…..,
अन् माझ्या उरामध्ये शेकडो ज्वालामुखींचा उद्रेक होऊ लागतो.
मी बुलंद आत्मविश्वासाने माझी कविता पुढे म्हणू लागतो.
इतक्यात बलुतकार कुठलीतरी ओळ पुन्हा म्हणावयास सांगतात.
मी ती ओळ पुन्हा म्हणतो.
माझ्या मनःचक्षुसमोर स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यावर थेंब, थेंब रक्त पडत असल्याचे दिसते.
आता तेच रक्त माझ्याही डोळ्यात उतरू लागते.
मी कविता म्हणत असतो.
माझ्यासमोर रमाईला न विसरणारे शुक्राचार्य सुटाबुटात उभे असतात, जागल्याकार झेंडे क्रांतीसूर्याच्या उन्हात न्हात असतात,
धम्माने बौध्द पण जातीने महार म्हणत स्वतःच्याच कातडे सोलून काढणारा रमेश असतो,
क्रांतीबाचा आसूड फडकविणारा हरिष असतो,
चंद्राचे गोडवे गाणार्‍यांना चालते व्हा सांगणारा राहूल असतो,
नामांतरासाठी उद्याच्या गर्भाचाही सौदा करणारा सतिश असतो.
मी कविता म्हणत असताना अनेकांना न्याहाळत असतो.
पण मला दिसतच नाही येथे कोणी गुणवंत, ज्ञानवंत, प्रतिभावंत, प्रस्थापित.
दिसत नाही मला…….,
एक हात ढुंगणावर ठेवून दुसर्‍या हाताने सलाम करणारा महान पाडगांवकर,
दिसत नाही मला…
उसन्या तुतारीची प्रतिक्षा करणारा थोर केशवसुत,
दिसत नाही मला…..,
सभोवार अश्रूंचा पाऊस बरसत असताना श्रावणमासी म्हणणारा बालिश बालकवी.
इथला प्रत्येकजण मला उद्याचा जनार्दन मवाडे बनलेला दिसतोय,
पोचिराम कांबळे दिसतोय,
प्रत्येकजण भविष्यातला भागवत झालेला दिसतोय.
हे तर वादळाचे हुंकार!
संघर्षाचे झंकार!!
विद्रोहाचे भिमकार!!!
चालले आहेत एकामागून एक,
एक विशाल लाँगमार्च चालला आहे हा.
कविता म्हणत, म्हणत, टाळ्यांच्या गजरात मी सुध्दा या लाँगमार्चमध्ये सामिल झालोय कधीचाच…….,
शिरी कफन बांधून!
शिरी कफन बांधून!!
– विवेक मोरे
मो. ८४५१९३२४१०

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

पदोन्नतीमधील आरक्षण आणि महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षा

गुरू जून 3 , 2021
Tweet it Pin it Email  राज्यातील जवळपास साडेपाच लाख मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांना सेवाकाळात मिळणारा पदोन्नतीचा लाभ महाराष्ट्र शासनाच्या दि.७ मे २०२१ च्या शासन निर्णयामूळे बंद झाला आहे. ७ मे २०२१ च्या शासन निर्णयामूळे एकिकडे मागासवर्गीयांची आरक्षित बिंदुनामावली नुसार येणारी ३३ टक्के पदे नष्ट करुन ती खुल्या प्रवर्गात वर्ग […]

YOU MAY LIKE ..