राज्यकर्त्या विरोधातील विचारसरणी गुन्हा आहे काय?-जेष्ठ पत्रकार जयंत पवार

ज्येष्ठ पत्रकार, नाटककार जयंत पवार हे माझे दैनिक ‘ महानगर’ मधील एकेकाळचे वरिष्ठ सहकारी। विचारांच्या आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या कारवाया सरकारी पातळीवर आणि राजकारणात सध्या सर्रासपणे सुरू आहेत। लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या चिंताजनक परिस्थितीकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी लिहिलेले हे अनावृत्त पत्र :
दिवाकर शेजवळ
ज्येष्ठ पत्रकार।
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

■ जयंत पवार ■

नमस्कार,
पत्र लिहिण्यास करण की, नुकताच मुंबई आणि पुणे येथे घडलेल्या दोन घटनांनी मी चिंतीत झालो आहे. पण मी चिंतीत झालो म्हणून नव्हे तर कुणालाही चिंता वाटावी अशा त्या घटना आहेत, असं मला वाटल्यामुळेच हे पत्र. शिवाय या घटना नाटकाशी-नाटकवाल्यांशी संबंधीत असल्यामुळे, कलाव्यवहाराशी संबंधीत असल्यामुळे तुम्हाला ते पाठवावं असं मला वाटलं. त्याबाबत आपलं मत जाणून घ्यावं, हाही माझा उद्देश आहे.
सध्या सुरू असलेल्या ऑगस्ट महिन्यातच या घटना घडलेल्या आहेत आणि अजून त्याची कुठेही फारशी वाच्यता वा त्याबद्दल चर्चा झालेली नाही.

9 ते 11 ऑगस्ट या दिवसांत दिल्लीहून जन नाट्य मंच (जनम) हा ग्रूप ‘तथागत’ हे नाटक घेऊन मुंबईला आला होता. हे नाटक सधारण 45 मिनीटांचे, छोटेखानी आहे. ते पथनाट्याच्या स्वरूपाचं आहे परंतु सादरकर्ते बंदिस्त सभागृहातही त्याचे प्रयोग करतात. मुंबईत त्याचे तीन दिवसांत आठ ठिकाणी प्रयोग झाले. नाटकाचा 10 ऑगस्ट रोजी आंंबेडकर भवन, दादर येथे प्रयोग होता. तेव्हा पोलिस येऊन नाटकाविषयी चौकशी करून गेले. त्याबद्दल खटकण्यासारखं काही कुणाला वाटलं नाही. परंतु दुसर्या दिवशी 11ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता अंधेरीच्या हरकत स्टुडिओ या छोट्या नाट्यगृहात असलेल्या प्रयोगाच्या आधी वर्सोवा पोलिस स्टेशनचे दोन सीआयडी नाट्यगृहात आले. त्यांंनी नाटकाच्या सेटचे फोटो काढले. त्यानंतर जन नट्य मंच ग्रूपचे प्रमुख सुधन्वा देशपांडे यांची चौकशी केली. नाटकाच्या स्वरूपाबाबत चौकशी केली. त्यानंतर हरकत स्टुडिओच्या मॅनेजरकडे यांना प्रयोगाला परवानगी कशी दिली, अशी विचारणा करत चौकशी केली. त्यानंतर हे पोलिस इमारतीच्या बाहेर गेले आणि तिथे प्रयोग बघण्यासाठी आलेल्या लोकांचेही त्यांनी फोटो काढले. पुढे नाटकाचा प्रयोग सुरू झाल्यावर 5 ते 7 मिनिटांनी हे दोन्ही पोलिस नाट्यगृहात घुसले आणि रंगमंचपासून चार ते पाच फुटांवर असलेल्या प्रवेशद्वारात उभे राहिले. तिथून त्यांनी प्रयोग पाहिला. नंतर काहीच झालं नाही. ते निघून गेले.


दुसरी घटना 15 ऑगस्ट्च्या पहाटे किंवा 14 ऑगस्टची मध्यरात्र उलटून गेल्यावर पुण्यातल्या एका हॉटेलवर घडली.किस्सा कोठी या नावाने तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेला ग्रूप ‘रोमिओ रविदास और ज्युलिएट देवी’ हे हिंदी नाटक घेऊन काही प्रयोग करण्यासाठी मुंबईतून पुण्याला गेला होता. 14 तारखेला रात्री ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ इथला प्रयोग संपवून हा पाच जणांचा ग्रूप चिंचवड इथल्या कामिनी नावाच्या हॉटेलवर मुक्कामाला गेला असता मध्यरात्री नंतर अडीच वाजता दोन पोलिसांनी त्यांच्या रूमवर धाड टाकली.’तुमच्यात यश खान कोण आहे? तो इथे कसा आला?’ असं विचारत यश खान या तरुणाची झडती घेतली. त्याचे आयडी प्रूफ तपासले. त्याच्या रूममध्ये असलेल्या दोघांशी त्याचा काय संबंध आहे अशी विचारणा करत तीन पुरुष व दोन स्त्रिया रहात असलेल्या ग्रूपच्या दोन्ही रूमची तपासणी केली. नाटकाचं सर्व सामान उचकटून पाहिलं आणि निघून गेले. अशी झडतीकरण्याचं कुठलंही वॉरंट त्यांच्यापाशी नव्हतं. 15 ऑगस्ट्च्या सुरक्षेसाठी ही तपासणी आहे, असं त्यानी नंतर सांगितल्याचं कळतं. पण तसं असेल तर संपूर्ण हॉटेलची किंवा इतर खोल्यांची झडती वा अन्य माणसांची चौकशी झालेली नाही. म्हणजे यश खान नावाच्या एका तरुणाकडूनच धोका असल्याची खबर पोलिसंना मिळाली असावी. ती कोणी दिली व त्यातून काय निष्पन्न झालं, या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत, मात्र नाटकाचे बॅक्स्टेज सांभाळणार्या यश खान या एका साध्या तरुणाच्या मनात आणि त्याच्या कुटुंबात कायमची दहशत मात्र निर्माण झाली. या दोन्ही घटना नाट्यकर्मींमध्ये प्रत्यक्ष दहशत निर्माण करणार्या आहेत, असं मला वाटतं आणि त्या एका सरकारी यंत्रणेकडून घडवल्या गेलेल्या आहेत.

आज अनेक्जण असं समजतात की, सध्या सगळीकडे सुरळीत चाललेलं असताना अशा किरकोळ दहशतीच्या आणि हिंसेच्या गोष्टींचा बाऊ करू नये. त्यामुळे जे अशा गोष्टींच्याविरुद्ध आवाज उठवू पहातात त्यांचा आपल्याला राग येतो. कलाक्षेत्रात आलबेल आहे, कोणावरही बंदी आलेली नाही, कोणीही दहशत माजवत नाही, असा आपला दृढ समज आहे. (महाराष्ट्रात दोन विचारवंत-कार्यकर्यांचे, जे लेखकही होते, खून झालेले आहेत हे आपण आता विसरूनही गेलेलो आहोत) अशा नकारात्मक गोष्टींविषयी बोलणं म्हणजे राष्ट्राच्या प्रगतीला अडथळा आणणं आहे, अशी आपली धारणा आहे.

या पार्श्वभूमीवर तुम्हाला वर नमूद केलेल्या गोष्टी गंभीर वाटतात का? त्या मराठी नाटकांशी संबंधित नाहीत, म्हणून आपण त्या दुर्लक्षित करणं रास्त ठरेल का? वरीलपैकी पहिलं नाटक करणारी संस्था डाव्या विचारांची आहे. (कॉन्ग्रेसच्या काळात ज्यांची हत्या झाली ते प्रसिद्ध रंगकर्मी सफदर हाश्मी यांच्या पत्नी मालोश्री या या संस्थेच्या प्रमुख आहेत.) दुसर्या नाटकाच्या ग्रूपमध्ये एक रंगकर्मी धर्माने मुसलमान आहे. विचारांनी डावं असणं आणि मुसलमान असणं या दोन्ही गोष्टी आज अक्षेपार्ह आहेत असं तुम्हाला वाटतं का? राज्यकर्त्यांच्या विरोधी विचारसरणी असेल तर तो गुन्हा ठरेल का? सरकारी आदेशावीना पोलिस अशा प्रकारे आदेशपत्राची अधिकृत प्रत नसताना कुठेही घुसखोरी करून चौकशी व झडती करू शकतील असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही या घटनेचा जाहीर निषेध कराल का? सरकारला याबद्दल कोणी जाब विचारला तर तुम्ही त्याचं समर्थन कराल का?
हे प्रश्न विचारून मी तुम्हाला जाब विचारतो आहे, असा कृपया गैरसमज करून घेऊ नये. तुम्ही यापैकी कोणत्याही प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तरी माझं काहीच म्हणणं नाही. शेवटी मौन हेही सूचक आणि बोलकं असतं. मात्र तुम्ही काही बोलाल ही अपेक्षा मात्र आहे. मी कोणाचीही मुस्कटदाबी (अगदी माझ्या विरोधकांचीही) मान्य करू शकत नाही. म्हणूनच न राहवून मी हे पत्र मित्रत्वाच्या नात्याने तुम्हाला लिहिलेलं आहे.चूक भूल द्यावी घ्यावी.

आपला मित्र
जयंत पवार
pawarjayant6001@gmail.com

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

राम जेठमलानी यांचे निधन माजी कायदामंत्री,ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे प्रदीर्घ आजाराने दिल्लीतील राहत्या घरी निधन झाले.

रवि सप्टेंबर 8 , 2019
Tweet it Pin it Email राम जेठमलानी यांचे निधन माजी कायदामंत्री,ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे प्रदीर्घ आजाराने दिल्लीतील राहत्या घरी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या दोन आठवड्यापासून ते आजारी होते. देशातील सर्वोत्कृष्ट विधीज्ञांमध्ये त्यांची गणना होत असे. राम जेठमलानी जन्म १४ सप्टेंबर, इ.स. १९२३:शिखरपूर, सिंध प्रांत, पाकिस्तान हे […]

YOU MAY LIKE ..