“सन्नातीचे अद्वितीय रिक्त सिंहासन शिल्प”

सन्नातीचे अद्वितीय रिक्त सिंहासन शिल्प
Excellent Empty Throne Sculpture of Sannati

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
-संजय सावंत-नवीमुंबई ambedkaree.com
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


दक्षिण भारतातील ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ या वर्तमानपत्रात कर्नाटकातील सन्नातीच्या स्थळाबाबत मोठा लेख आर.एस.कुलकर्णी यांनी ३० एप्रिल २०२० रोजी लिहिलेला होता. त्या लेखा सोबत एका शिल्पाचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. त्या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात भगवान बुद्धांचे रिक्त सिंहासन दाखविले आहे. तरी सुद्धा त्या प्रतिकामय शिल्पामधून त्यांच्या प्रती आदर आणि पूज्यभाव व्यक्त केलेला आढळतो. असे हे आगळेवेगळे शिल्प भारतातील लेण्यांमधील आणि स्तुपामधील शिल्पात अग्रणी ठरावे. कंनगणहल्ली येथील सन्नाती जवळ सापडलेल्या स्तूप व शिल्पांच्या असंख्य अवशेषात हे शिल्प उठून दिसते. सध्या हा स्तुप ‘शाक्य महाचैत्य’ म्हणून ओळखला जात आहे.

सम्राट अशोकाच्या काळापर्यंत भगवान बुद्धांची प्रतिमा निर्माण झाली नव्हती. त्यामुळे स्तूपांची मोठ्या श्रद्धेने पूजा केली जात असे. त्याच बरोबर त्याकाळी भगवान बुद्धांच्या जीवनाशी संबंधित प्रतीकांची पूजा होऊ लागल्याने त्यांच्या प्रतिमा स्तुप उभारताना घडविल्या गेल्या. यामुळे त्यांची प्रतीके वंदनीय मानण्यात येऊ लागली. भगवान बुद्धांच्या जन्माचे प्रतीक म्हणून हत्ती, गृहत्याग याचे प्रतीक म्हणून घोडा, ज्ञानप्राप्तीचे प्रतीक म्हणून बोधिवृक्ष आणि महापरिनिर्वाणाचे प्रतीक म्हणून स्तूप यांना महत्त्व प्राप्त झाले. सन्नातीचे प्रस्तुत शिल्प हे भगवान बुद्धांच्या रिक्त सिंहासनाचे व ध्यान अधिष्ठानाचे प्रतीक असून त्यांच्या प्रती दाखविण्यात आलेला आदर व पूज्यभाव त्यातून पुरेपूर व्यक्त होतो.

बुद्धांचे रिक्त सिंहासन दाखविलेल्या शिल्पात बुद्धांचे पदकमल असलेली चौकट स्पष्ट दिसत आहे. त्यामध्ये तळव्याच्या ठिकाणी चक्र दाखवून ३२ लक्षणांची जाणीव करून दिली आहे. तसेच या सिंहासनाच्या डाव्या बाजूला खाली बसून नमन करत असलेल्या व्यक्तीचे शिल्प सम्राट अशोकाचे आहे असे वाटते. कारण शिल्पाच्या मस्तकावर तुरा असलेला फेटा आहे. दोन्ही हातात कंकणाच्या तीन जोडया आहेत. गळ्यात तनुपर्यंत आलेली अलंकृत माला तसेच कर्ण आभूषणे स्पष्ट दिसत आहेत. उजव्या बाजूच्या नमन करीत असलेल्या व्यक्तीच्या अंगावरसुद्धा तसेच अलंकार आहेत. कमरेला वस्त्राची जाडसर वळकटी दिसते. शिरपेच थोडासा वेगळा वाटतो. या सिंहसनास तिन्ही बाजूंनी टेकण्यासाठी सुरक्षित कठडे असून त्यास त्रिमितीय आकार दिला असल्याने एक उत्कृष्ट शिल्प आकारास आले आहे. या सिंहासनाच्या पाठीमागे सुद्धा दोन सेवक चवरी ढाळीत आहेत असे स्पष्ट दिसते.

असे हे सौंदर्याने नटलेले शिल्प भारतीय शिल्पकलेत प्रथमच आढळले आहे. या शिल्पाच्यावर असलेल्या आडव्या तुळवीवर काही ओळी दिसत आहेत. तसेच सिंहासनाच्या उजव्या बाजूला असलेल्या स्तंभावर वर्तुळाकार कमळचित्रे यांचे नक्षीकाम केलेले आढळते. स्तंभावर वरच्या बाजूस एक धड असलेले दोन सिंह दाखविलेले आहेत. त्यांची आयाळ सुद्धा स्पष्ट दिसून येते. तसेच त्याच्याखाली लहान गजराज यांच्या प्रतिमा कोरलेल्या आढळतात. याच शिल्पा प्रमाणे दुसरे एक भंगलेले शिल्प आढळून आले आहे. त्यात रिक्त सिंहासनाच्या पाठीमागे असलेल्या बोधिवृक्षास सम्राट अशोक वंदन करीत असल्याचे दिसत आहे.

सिद्धार्थच्या जन्मापासून ते ज्ञानप्राप्ती पर्यंत आणि पुढे महानिर्वाणा पर्यंत सर्व इतिहास स्तूपाच्या शिल्पाद्वारे उभारलेला आढळतो. जातक कथेतील काही कथा सुद्धा येथे चित्रित केल्या आहेत. भगवान बुद्ध यांची प्रतिमा येथे नागराज आणि धम्मचक्राद्वारे सुद्धा शिल्पात कोरलेली आढळते. तरी सन्नातीच्या स्तुपावर अवर्णनीय सुबक शिल्पकाम करणाऱ्या सर्व अज्ञात शिल्पकारांना माझा प्रणाम.

— संजय सावंत ( नवी मुंबई )

(प्रस्तुत लेखक बौद्ध संस्कृती आणि इतिहास यांचे अभ्यासक आहेत त्याचे या संदर्भात विविध लेख सोशल आणि वेब मीडियात प्रकाशित होत असतात.)

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

स्वामी तिन्ही जगाचा गाडीविना.....?

मंगळ मे 12 , 2020
Tweet it Pin it Email स्वामी तिन्ही जगाचा गाडीविना…………? ******************* ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ Pin it Email https://www.ambedkaree.com/excellent-empty-throne-sculpture-of-sannati/#SU1HXzIwMjAwNTE साधा जिल्हा परिषदेचा सदस्य असो की कुठलाही नगरसेवक, तो एसटी वा बसमधून ये जा करताना कोणाला कधी दिसतो काय? तरीही अनेक दिग्गज नेते ‘बिचारे’ गाडीविनाच असल्याचे निवडणुकांवेळी त्यांचा संपत्तीचा तपशील […]

YOU MAY LIKE ..