हत्तीणीच्या मृत्यूला न्याय मिळेल काय ?.

हत्तीणीच्या मृत्यूला न्याय मिळेल काय ?.
************
सागर रामभाऊ तायडे www.ambrdkaree.com
************


अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवते ते शिक्षण देणारा देशच महासत्ता असतो. अमेरीकेने हे सिद्ध केले की तो सुशिक्षित लोकांचा देश आहे.एका अश्वेत (काळ्या किंवा कृष्णवर्णीय) अमेरिकन नागरिकाला वर्णद्वेषातुन झालेल्या पोलीसी मारहाणी विरोधात व्हाईट हाऊस घेरले जाते. सर्व काळे गोरे शिस्तबद्ध,शांतपणे जनआंदोलन करून पोलिसांना गुदगे टेकायला लावते. हे सुशिक्षित पणाचे लक्षण आहे.

भारतातील केरल राज्य हे शिक्षणात एक नंबर वर आहे.त्या राज्यात एका मुक्या प्राण्यावर हत्तीनीवर अननस मध्ये स्पोटक फटके भरून खाण्यासाठी दिले ही घटना मानव जातीला कलंक लावणारी ठरत आहे.कोरोना संकटाला समर्थपणे तोंड दिल्यामुळे केरलाचे नांव गौरण्यात येत असतांना ही हत्तीणीची घटना केरला राज्याच्या शिक्षण आणि मानसिकतेला कलंकित करणारी आहे.

भारतात लाॅकडाऊन काळात अनेक असंघटित गरिब कामगार,मजदूर त्यांची मुलमुली रस्त्यावर जाती व्यवस्थेमुळे भूकबळी ठरवून मारल्या गेली.अनेक गरोदर महीला रस्त्यावरुन हजारो मैल चालत गेल्या काही प्रसुत झाल्या. हे सगळ सुरु असतांना भारतातील अक्षर ओळख असलेले लोक,सुरक्षित नोकरी करून सुरक्षित ठिकाणी राहणारे (सुशिक्षित म्हणता येणार नाही.) स्वत:च्या घरातील पाककला. टिकटाॅक चे विडीओ,”नथीचा नखरा,केसातील गजरा”सारख्या थिल्लरपणात मग्न होते. ज्यांनी या असह्य मजदूरांना अन्नाची पाकिटे देऊन मदत केली त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार आणि अभिनंदन.त्यांची इतिहासात नोंद होणार आहे.बहुसंख्य माणसांची मानसिकता अमेरिका आणि भारत यातील फरक आहे.अमेरिकेतील सुशिक्षित स्वतंत्र मानसिकता आणि भारतातील अक्षर ओळखीची गुलामी मानसिकता.निसर्गासाठी छोट्या मुंगी पासून ते अजस्त्र हत्तीपर्यंत,छोट्या पक्षा पासून ते माणसा पर्यंत सगळे प्रिय असतात. सृष्टी हीच शक्ती आणि सगळी तिची लेकरे तिच्यासाठी समान.हा न्याय निसर्गातील सगळे प्राणी पाळतात फक्त माणूस सोडून.कुठलाही प्राणी मादीच्या इच्छेशिवाय तिचा उपभोग घेत नाही.कुठलाही प्राणी भूक नसताना दुसऱ्या प्राण्यावर हल्ला करत नाही पण स्वतःच्या महत्वाकांक्षे साठी आई बापाच्या डोक्यात दगड घालणारी क्रूर जात फक्त माणसाची असते.त्याला हत्तीच्या जीवाचं काय पडलय ?.


नदीच्या मधोमध निश्चल उभी राहिलेल्या हत्तीचा फोटो सोशल मीडियावर फिरतोय.त्या फोटो बाबतची कहाणी अत्यंत करूण आहे. केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील वेल्लीयार नदीत उभा राहिलेल्या गर्भवती हत्तीणीचा तो फोटो आहे. २७ मे २०२० ला केरळ राज्याच्या एका फॉरेस्ट ऑफिसर ने मोहन कृष्णन ने “माफ कर बहिणी” म्हणून एक पोस्ट त्याबद्दल शेअर केली.सायलेंट वॅली मधुन एक हत्तीण पलक्कड जिल्ह्यात भुकेने व्याकुळ होऊन फिरत होती. तिला कुणीतरी फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घातला. फटाके तोंडात फुटल्यामुळे तिचे तोंड आणि जीभ फाटली. कोणताही प्राणी हिंस झाला तर शांत राहत नाही.कुत्रा असो की हत्ती तो पिसाटतो पण या हत्तीणीने या ही अवस्थेत तिने आजुबाजुच्या कुठल्याही माणसाला मारले नाही,कुठल्याही इमारतीला इजा केली नाही, रागाने कसली नासधूस केली नाही, शांतपणे पाण्याच्या शोधत ती चालत राहिली.

शेवटी तिला नदी दिसल्यावर नदीच्या मधोमध जाऊन ती शांत उभी राहिली. वन विभागाला माहिती कळल्यावर मोहन कृष्णन तिथे पोचले. तिने पाण्याबाहेर यावं म्हणून दोन हत्ती सुद्धा पाण्यात सोडले. तिला वाट दाखवण्या करता, पण ती बाहेर आली नाही. पाण्यात डोकं खुपसून निश्चल राहिली. दिवसभर वन विभागाने प्रयत्न केले पण ५ च्या सुमारास तिने जलसमाधी घेतली.पोस्टमोर्टम मध्ये कळलं ती गर्भवती होती.मोहन कृष्णन ने लिहिलंय आम्ही तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो तिने तो नाकारला. माणसाच्या कृतीचा तिने केलेला तो निषेध होता.तिला त्यांच्यावर माणसावर विश्वास ठेवावा वाटला नाही. तिने नदीतून बाहेर येण्याचं नाकारलं.

माणसाला माहित आहे त्यांचे बाळ बाहेर येण्यासाठी नऊ महिने नऊ दिवस लागतात पण कोणत्या प्राण्याच्या बाळाला बाहेर येण्यासाठी किती महिने लागतात याची माहिती आहे काय?. वीस महिने लागतात एक हत्तीचं बाळ बाहेर यायला. नदीत उभी राहिली तेंव्हा काय भावना असतील तिच्या?. तिच्या पोटातल्या बाळाला फटाक्याच्या वेदना होऊ नये म्हणून बाहेर नसेल का आली ती?.वेदना सहन करण्याच्या पलीकडे गेल्या म्हणून बाळ सुरक्षित राहील पाहिजे म्हणून पाण्यात डोकं खुपसून निश्चल राहिली असेल का ती?.छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर संध्याकाळी सात नंतर दरवाजे बंद होत होते.तेव्हा बाराशे फुटांचा कडा हिरकणी फक्त बाळाला दूध पाजता यावं म्हणून चढुन गेली होती. आईपण निभावण्यासाठी आई स्वतः चे प्राण पणाला लावते मग ती माणसातली आई असो नाही तर प्राण्यांतील.एका गर्भार हत्तीणीला फटाके चारून काय मिळवलं त्या माणसाने?. ते कृत्य एका कोणी माणसांने केले.पण अख्खी मानव जात बदनाम करून गेली.


मागासवर्गीय आदिवासी,अल्पसंख्याक आणि भटक्या जाती जमातीचे निर्दयपणे खून होतात तेव्हा ही कोणत्याही माणसांच्या जातीला दुख होत नाही.तेव्हा संपूर्ण गांव खून करणाऱ्या माणसाच्या जातीच्या पाठी मागे उभे राहते.खैरलांजी,जवखेडा,खेर्डा,सोनाई,राहता असे एक नाही हजारो उदाहरण राज्यात देशात घडली आहेत.त्यावर अमेरिके सारखे सर्व लोक एकत्र येवून निषेध करीत नाही.येवढा फरक आहे अमेरिका आणि भारतात.धर्माचा पगडा संस्कार लहानपणा पासून माणसाच्या जातीवर केलेले असतात.धर्माने कि अधर्माने,स्वर्ग कि नरक,पाप कि पुण्य हे मापदंडाच्या कसोट्या कोरोना,चक्रीवादळ,आग ही सगळी प्रलयाची रूपे भूतकाळात केलेल्या पापाची गोळाबेरीज असेल असे सांगणारे देवाच्या मंदिरातून बाहेर पडून आज बेरोजगार होऊन बसले आहेत. नाही तर त्यांनी यज्ञ,होमाचा झपाटा लावला असता.कोरोना पॉजीटीव रुग्ण,चक्रीवादळामुळे घराचे शेतीचे नुकसान झालेला मजदूर आणि शेतकरी यांचा विचार करीत असतांनाच नदीच्या पाण्यात निश्चल उभा राहिलेल्या हत्तीणीचा चेहरा माझ्या समोर येतो.डोळ्यात खळणारं पाणी थांबवण मुश्किल होऊन जातं.


माणसाला न्याय देतांना माणसाची जात आडवी येते. एका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय कदाचित मनुवादी हिंदुत्व मानणाऱ्या माणसाच्या जातीव्यवस्था वर्णव्यवस्था न्यायालयात होणार नाही.पण भारतीय संविधान मानणाऱ्या माणसाच्या न्यायालयात न्याय जरूर मिळेल.आसाराम,राम रहीम सारख्यांना शिक्षा देण्यास भाग पडणारा वरिष्ठ पोलीस अधिकारी हत्तीणीच्या मृत्यूला न्याय मिळवून देईल हीच अपेक्षा.

सागर रामभाऊ तायडे, ९९२०४०३८५९,
भांडूप मुंबई

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

आणि 'निलसागरा'चे डोळे पाणावले ! -भीमप्रकाश गायकवाड

शनी जून 6 , 2020
Tweet it Pin it Email आणि ‘निलसागरा’चे डोळे पाणावले ! *************** भीमप्रकाश गायकवाड – **************** Pin it Email https://www.ambedkaree.com/kerlaelephantkillingsagartayade/#SU1HXzIwMjAwNjA युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रदान केलेल्या नावाची अशांत हस्ती- शांतिस्वरूप आज अचानक शांत झाली आणि ‘निलसागरा’चे डोळे पाणावले ! भारतीय बौद्ध महासभेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष, द्रष्टा विचारवंत, परखड वक्ता, धम्माचा अभ्यासक, […]

YOU MAY LIKE ..