आयरिश भिक्खू ‘धम्मलोक’ यांचे कार्य Irish Buddhist Monk who faced down British Empire.

आयरिश भिक्खू ‘धम्मलोक’ यांचे कार्य
Irish Buddhist Monk who faced down British Empire.

⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛

-संजय सावंत-नवी मुंबई
-www.ambedkaree.com

२ मार्च १९०१च्या पोर्णिमेच्या दिवशी मॅनमार (ब्रह्मदेश) मधील प्रसिद्ध श्वेडगॉन पॅगोडा मध्ये एक ब्रिटिश पोलीस बूट घालून तेथील विहारामध्ये गेला. तेव्हा एका आयरिश गोऱ्या भिक्खूने ते पाहिले आणि त्याला नम्रपणे तात्काळ पायातील बूट बाहेर काढण्यास सांगितले. श्वेडेगॉन पॅगोड्याचा अनादर केला हे त्या भिक्खूंना बिलकुल आवडले नाही. ही बातमी लगेच रंगूनमध्ये पसरली. लोकक्षोभ झाला. या प्यागोड्यात बुद्धांचे केसधातू आहेत आणि अशा या पवित्र जागी ब्रिटिश पोलिस पायात बूट घालून गेला हे तेथील जनतेला अजिबात रुचले नाही. या लोकक्षोभाचे पुढे चळवळीत रूपांतर झाले. आधीच ख्रिस्ती मिशनऱ्या ब्रिटिशांच्या सहाय्याने त्यांचे ध्येय साधत होत्या. त्याबद्दल तेथील बौद्ध जगतात राग होताच. यामुळे या चळवळीचे पुढारीपण त्या गोऱ्या आयरिश भिक्खूकडे आले. तेथील जनतेचा त्यांना भरघोस पाठिंबा मिळाला.

या आयरिश भिक्खुंचे नाव होते ‘धम्मलोक’. आयर्लंडमधील डब्लिन येथे त्यांचा जन्म १८५० मध्ये झाला. तरूणपणी कामगार म्हणून काम करीत ते अमेरिकेला गेले. पुढे खलाशी म्हणून ते बोटीने जपानला आले. त्यानंतर १८७० च्या दशकात रंगून येथे आले. तेथे त्यांनी टेली क्लार्क म्हणून काम केले व तेथेच स्थायिक झाले. बर्मी भाषा शिकले. हळूहळू रंगूनमधील बौद्ध संस्कृतीने त्यांच्या आयुष्याला नवे वळण लागले. बुद्ध धम्माचा अभ्यास त्यांनी सुरू केला. आणि बुद्ध तत्त्वज्ञानाने ते भारून गेले. ईश्वराचे स्थान नसलेला आणि नामरूपाला व निसर्गाला महत्व देणारा धम्म त्यांना आकलन झाला. मग त्यांनी १८८४ नंतर भिक्खूची उपसंपदा घेतली. धम्मोपदेश देत ते सगळीकडे फिरू लागले. त्यावेळच्या ख्रिस्ती मिशनरी आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांची त्यांनी वर्तमानपत्रात विविध लेख लिहून भंबेरी उडवली. त्यांच्या धर्मातील थोतांडावर निबंध लिहिले. ब्रिटिश आणि ख्रिस्ती मिशनरी या गोऱ्या आयरिश भिक्खूचे वागणे आणि लिखाण वाचून बुचकळ्यात पडत. पुढे सन १९०० मध्ये ते तेथील विहारातील मुख्य भिक्खू झाले. आणि मग धम्माचा प्रसार अधिक जोमाने चालविला.


ख्रिस्ती मिशनरी जबरदस्तीने व युक्तीने धर्मांतराची चळवळ चालवीत होते. पण धम्मलोक यांनी त्यास कडाडून विरोध केला. त्यामुळे सर्व बर्मी जनता त्यांच्या मागे उभी राहिली. ख्रिस्ती मिशनरी व त्यांचे बऱ्याचदा खटके उडत. आयरिश गोऱ्या भिक्खूची बुद्धाप्रती असलेली श्रद्धा पाहून ते अवाक होत होते. दिवसेंदिवस धम्मलोक यांना जनतेचा पाठिंबा वाढत गेला. पुढे त्यांनी १९०७ साली ‘बुद्धिस्ट ट्रॅक्ट सोसायटी’ स्थापन केली. त्यांचा पुढे मंडाले येथे जाहीर सत्कार करण्यात आला व त्यांना ‘तथांनाबेग’ ही संघ प्रमुखाची पदवी दिली.धम्माच्या प्रसारासाठी ते पुढे सिंगापूर, जपान, सयाम, चीन व सिरिलंका येथे जाऊन आले. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मांतराबाबत त्यांचे अनेक वाद-विवाद स्थानिक वृत्तपत्रातून प्रचंड गाजले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जसे ‘रीडल्स इन हिंदुइझम’ लिहिले तसेच त्यांनी छोटे छोटे प्रबंध लिहून ख्रिस्ती मिशनरी आणि ब्रिटिशांची अंधश्रद्धा उघड केली. त्यांची काही नावे खालील प्रमाणे होती.

१) The Bible God disproved by nature.२) The teaching of Jesus not adopted to modern civilization.३) Rights of Man.


या अशा पुस्तकामुळे त्यांना अनेक शत्रू झाले होते. देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर ब्रिटिशांनी दाखल केला. तरीही स्वतःची काळजी घेत १९१२-१३ च्या दरम्यान ते मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे आले. पुढे १९१४ मधे बँकॉक येथे गेले. सिंगापूर, थायलँड येथे त्यांनी बौद्ध शाळा चालू केल्या. सिंगापूरच्या चिनी व्यापारी लोकांचा त्यांना पाठिंबा होता. शान समाजाचा पाठिंबा होता. डवाई कम्युनिटीचा पाठिंबा होता. मात्र त्याचवेळी पहिले महायुद्ध सुरू झाले. आणि त्यानंतर त्यांचे काय झाले हे आजपर्यंत कुणालाच ज्ञात नाही. कदाचित कंबोडिया येथे त्यांचे निधन झाले असावे असे म्हटले जाते. हळूहळू ते विस्मरणात गेले. आज इतक्या वर्षांनी आशियाई व युरोपीय देशांमध्ये बुद्धिझम वाढलेला दिसत आहे त्याचे कारण दीडशे वर्षापूर्वी अशी माणसे जन्माला आली आणि त्यांनी अनेक बौद्ध संस्था आणि शाळा स्थापन केल्या म्हणून. आजही त्यांची पुस्तके वाचली जातात. आयरिश देशाच्या इतिहासात कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट ऑर्थोडोक्सीस यांचा कट्टर विरोधक म्हणून त्यांची नोंद आहे. भन्तेजी ‘यु धम्मलोक’ यांना माझे अभिवादन.

(प्रस्तुत लेखक बौद्ध साहित्य आणि संस्कृती यांचे अभ्यासक आणि विश्लेषक आहेत.)
⚛⚛⚛

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

रा.स्व.संघ २१/ संघाचे छ.शिवराय गोब्राह्मण प्रतिपालक आणि मुस्लीमद्वेष्टेच का?- प्रा. हरी नरके

बुध मे 6 , 2020
Tweet it Pin it Email रा.स्व.संघ २१/ संघाचे छ.शिवराय गोब्राह्मण प्रतिपालक आणि मुस्लीमद्वेष्टेच का?- प्रा. हरी नरके ⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛ Pin it Email https://www.ambedkaree.com/irish-buddhist-monk-who-faced-down-british-empire/#SU1HXzIwMjAwNTA बहुजनांचे महापुरूष पळवायचे, त्यांचे दैवतीकरण करायचे आणि त्यांना स्वत:च्या कब्ज्यात ठेवायचे, आपल्या फायद्यासाठी हत्त्यार म्हणून वापरायचे ही रा. स्व. संघाची कपटनिती आहे. महाराजांचा जन्म १६३० चा. शिवराय १६८० […]

YOU MAY LIKE ..