आम्ही असे का वागतो?

एक अनुत्तरित मंथन: आम्ही असे का वागतो?- गुणाजी काजीर्डेकर

पॅथर राजा ढाले यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी आणि चैत्यभूमीवर त्यांचे पार्थिव आणल्यानंतर झालेली गर्दी चीड आणणारी होती.

राजा ढालेंच्या निधनानंतर सोशल मिडियावर लेखण्या नव्हे तर तलवारी उपसल्या गेल्या. ढालेंच्या जाण्याने समाज दिग्मुढ झाला होता. ज्यांनी चळवळ जवळून पाहिली, त्यांचे हात क्षणभर स्तब्ध झाले. काय लिहावे, काय बोलावे? प्रत्येकाच्या मनावर प्रचंढ आघात झाला असून एकमेकांना सावरणे, धीर देण्याचे काम झाले. प्रारंभी राजा ढाले गेले यावर विश्वासच बसेना. कारण पत्रकार मित्र दिवाकर शेजवलकर यांचा पहिला मेसेज आला. त्यांना फोन केला असता, “हेमंर रणपिसेने पोस्ट टाकल्याने मला समजले.” असे सांगताच मी ज.व.पवारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ज.वि.चा सुमारे ४० मिनिटे फोन अॅन्गेज लागत होता.

बोरिवलीत राहणा-या सयाजी वाघमारे, ओबीसु नेते मारूती कुंभार यांना तोपर्यंत माहितीच नव्हती. राजा गेल्याचे सांगताच त्यांना धक्का बसला. दरम्यान माझे डझनभर मिसकाॅल पाहून ज.वि.ने फोन केला आणि बातमी खरी असल्याचे सांगितले. सकाळ उजाडताच अनेकांनी विक्रोळीच्या दिशेने धाव घेतली. दुस-या दिवशी म्हणजे १७ जुलै रोजी चैत्यभूमीवर अंतिम संस्कार करण्याचे निश्चित झाल्यावर त्यांचे पार्थिव गोदरेज हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले. ही बातमी समजताच चळवळीतील सहकारी नेते कार्यकर्त्यांनी ढाले यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. केंद्रिय मंत्री रामदास आठवले त्यांच्या सहका-यांसोबत पोहचले. भारिप बहुजन महासंघाचे अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी कुटुंबाला धीर दिला. याही स्थितीत ढालेंची कन्या गाथा हिने स्वत:ला सावरले हे विशेष होय!


आता अंतिम प्रवासाला सुरुवात झाली. चैत्यभूमीला नेणार एवढेच माहित, पण पूढे काय? नियोजनाच्या अभावी अनेक संघटना, महिला कार्यकर्या दादर, मध्ये आपल्या लाडक्या नेत्याचे शेवटचे तरी पाहता यावे यासाठी ताटकळत उभा होता. कोरबा मिठागरातील कार्यकर्त्यांनी खोदादाद सर्कलला चार तास प्रतीक्षा केली. तर काही जण ऐकिव माहितीवर सेना भवनापासून अंत्ययात्रा निघेल असे सांगत होता. बहुतांशी लोकांचे दादर टीटी पासूनच अंत्ययात्रा निघावी असे मत होते. परंतु ज्यांनी नियोजन केले अथवा करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी कोणती बांधिलकी जोपासली हा प्रश्न राजा ढालेंच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतरही विचारला जात होता?

ढालेंचे पार्थिव आल्यानंतर पार्थिवाजवळ फक्त ढाले यांचे कुटूंबिय आणि मान्यवरच थांबतील. कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये. पण सूचना न ऐकण्यासाठीच असतात असा जणू विडा उचलल्यागत ‘लोक’ वागले. मी ‘लोक ‘ हा शब्द हेतुत: वापरला आहे. आपण डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी असतं तर असे वागलो नसतो. दूरदर्शन वाहिन्यांच्या वार्ताहरांना छायाचित्रे काढताना कसरत करावी लागली. घटनेचे गांभीर्य विसरल्यागत आपण सारे का वागलो? भाईचे जाणे चटका लावणारे होते. तरीही अनुयायांनी शांतपणे निरोप दिला. नामदेवने एक्झिट घेतली….आंबेडकरी जनतेने त्यांना साजेल असाच सॅल्युट ठोकून निरोप दिला. राज ढालेंच्याचबाबतीत घाईगर्दी का व्हावी? विक्रोळी कन्नमवार नगर म्हणजे महाराष्ट्र नव्हे! राजा ढाले यांचे अनेक वर्षे वास्तव्य होते मान्य, पण हजारो लोक विक्रोळी ते दादर दरम्यान प्रतीक्षा करीत होते त्याचे काय? राजा ढाले यांची अंत्ययात्रा खोदादाद सर्कलपासूनच निघणे आवश्यक होते. आणित्यांच्या कर्तृत्वाला साजेशीच ठरली असती. परंतु याबाबत ज्या कोणी नियोजन करण्यात पुढाकार घेतला त्यांना इतरांचाही विचार करण्याची गरज का भासली नाही? विचारवंत सुरेश सावंत यांनीही खंत व्यक्त केली आहे. पण, चळवळीतील हजारो कार्यकर्ते प्रसारमाध्यमातील एक घटक असल्याने हे असे का घडले असा प्रश्न करीत असल्याने त्यांच्या मनातील

प्रश्न जनतेपुढे ठेवण्याचे मी काम केले एवढेच.

दुसरे असे की, राजा ढाले यांचे निधन पहाटे झाले. उजाडता उजाडता बातमी कळल्यावर काही शहाण्यांनी “भारिप बहुजन महासंघाचे अॅड.बाळासाहेब आंबेडकर कोठे आहेत?” असा प्रश्न केला. संध्याकाळी सोशल मिडियावर बाळासाहेबांच्या भेटीची छायाचित्रे झळकताच, ज्यांनी या शंका उपस्थित केल्या त्यांच्या सुरात सूर मिळवून “अॅड.बाळासाहेब आंबेडकरांनी राजा ढाले यांच्या कुटुंबियांना पाच (५) कोटी रूपये मदत देण्याची मागणीच केली याला काय म्हणायचे? तेवढ्याने समाधान झाले नाही म्हणून की काय, राजा ढाले यांनी पँथर का फुटली यामागील सत्य एकदा ज.वि.ने सांगून टाकावे अशी मागणी केली. तोवर राजा ढालेंचे पार्थिव गोदरेज हॉस्पिटलमध्ये होते हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. प्रश्न विचारायला हरकत नसावी,पण काळावेळेचे भान ठेवायला नको? मी तर म्हणतो हाही एक उपद्रवमूल्य निर्माण करण्यातलाच प्रकार आहे.

भारिप बहुजन महासंघात राजा ढाले यांची कोंडी झाल्याची जी जोरदार आक्षेपवजा विधाने केली जात आहेत, त्याची उत्तरे अॅड.बाळासाहेबांऐवजी ज.वि. पवारांनी द्यायला हवीत अशी मागणी का होत नाही? ज.वि. आणि राजा यांच्या मैत्रीविषयी कोणाला शंका वाटते का? ५० वर्षांहून अधिक काळ मैत्री असलेले ज.वि.नंतर भारिपचे अनेक वर्षे सरचिटणीस होते. राजा ढालेंना “भारिप” मध्ये अधिकार नव्हता म्हणून ते बाहेर पडले की त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला? अवमान सहन करणे हा ढाले यांचा पिंड कधीच नव्हता याकडे मी तमाम जनतेचे लक्ष वेधू इच्छितो.
आणखीन एका गोष्टीकडे मला वळणे क्रमप्राप्त वाटते ते म्हणजे आमच्यापैकी अनेकांचे उफाळून आलेले सेल्फीप्रेम! पार्थिव असलेला टेम्पो चैत्यभूमीवर आल्यानंतरही सेल्फीचा मोह अनेकांना आवरता आला नाही ही सुखान्तिका आहे की शोकांतिका हेच कळायला मार्ग नाही. आंबेडकरी चळवळ सेल्फीमध्ये अडकत चालली असल्याचा याहून दुसरा पुरावा कोणता असू शकतो?

राजा ढाले यांच्या स्वभाव वैशिष्ट्यावर काय बोलावे? जाणकारांना राजा ढाले चांगले माहित आहेत. ते कडक व स्पष्ट बोलायचे पण फटकळ नव्हते. एखाद्याशी पटत नाही, त्याचा नाद करायचा नाही हे ढालेंच्या स्वभावातच होते. त्यामुळे ढाले कोणत्या विचारपीठावर किती स्थीर राहिले याचाही शंका निर्माण करणा-यांनी शंव घ्यायला हरकत नाही.

असो, राजा ढाले तेव्हाही चर्चेचा विषय होते आणि निधनानंतरही चर्चा होत आहे. एखादा दिग्गज नेता आपल्यातून निघून जातो, त्यावेळी त्याने मांडलेले विचार पुढे नेण्याबाबत भूमिका ठरवल्या जातात किंवा तशाप्रकारचे आवाहन केले जाते. तशा उत्साहाचा मागमूस कोठेच आढळत नाही! असे का? ही अनास्था का निर्माण होते? कोण खतपाणी घालते? चळवळ जोमात होती तेव्हा लोक, कार्यकर्ते नेत्याभोवती गराडा घालीत. आता नेता रस्त्याने चालला तर ढुंकून बघत नाहीत! ही अनास्था चळवळीला मारक आहे. नेत्याने चळवळीच्या आधारस्तंभाला जपले पाहिजे. चळवळीला आलेली मरगळ चळवळ संपुष्टात आणण्यास कारण ठरू नये हा इशारा देत आहोत.

गुणाजी काजिर्डेकर
रविवार दि.२१ जुलै२०१९

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

एक होता 'राजा'..! - दिवाकर शेजवळ यांची लेख मालिका

सोम जुलै 22 , 2019
Tweet it Pin it Email जेष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांची पँथर दि.नेते राजा ढाले याच्या वरील लेख मालिका एक होता ‘राजा’……….! – दिवाकर शेजवळ राजाभाऊ ढाले हे गेल्या आठवड्यात काळाच्या पडद्याआड गेले.1977 सालातील दलित पँथरच्या बरखास्तीनंतरही 1990 च्या दशकाच्या अखेरपर्यंत ते बऱ्यापैकी कार्यरत होते. त्या कालखंडात ‘मास मूव्हमेंट’ आणि ‘सम्यक […]

YOU MAY LIKE ..