बतावणी-गुणाजी काजीर्डेकर यांची लेखमाला

बतावणी

“काँग्रेसने बहुजनांचा आधार असल्याचे केवळ चित्र निर्माण केले. पक्षांतर हा प्रकार राजकारणात नवीन नाही,आणि काँग्रेसवाल्यांना तर मुळीच नाही. पक्षनिष्ठेचा मुडदा पाडण्याचे काम शरद अनेकदा केले असून स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी, धोबीपछाड राजकारणाचा पाया घालणा-या शरद पवारांना पक्षांतरामुळे इतरांना कशा वेदना होतात, याचा पवारांनी अनुभव घेतला. पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांचा पडलेला चेहरा खूप काही सांगून गेला. तीच गत काँगीजनांची आहे. आश्वासनांवर झुलवत ठेवून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे काम काँग्रेसने केले. एक नेता पाच वेळा निवडणूक लढवतो निवडून येतो. इतरांच्या हातात धत्तुरा! स्वपक्षियांप्रमाणेच जनतेलाही गुमराह करणा-या काँग्रेस-राष्ट्रवादीला बसलेली ही जोरदार चपराक आहे.”

दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा,
जिंदगी हमे तेरा, ऐतबार ना रहा

राजकपूर, राजेंद्र कुमार आणि वैजयंतीमाला या दिग्गज अभिनेत्यांच्या अभिनयाने गाजलेल्या संगम या चित्रपटातील गाण्याची आठवण यावी अशा घटना सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात घडत आहेत, अनेकदा त्या घडविल्या गेल्या. राजकारण हा आता फार्स म्हणजे तमाशा झाला असल्याची अधूनमधून टीका केली जाते. पण आम्हाला ही टिका मान्य नाही. उलट तमाशा या शब्दाचा अर्थ समजून न घेथा टिकाटापण्या करुन आपले अज्ञान प्रकट करण्याचे काम या निमित्ताने केले जाते याबाबत आमचा आक्षेप असून तो कायम असेल. तमाशा हि एक कला असून, रंगभूमिचा एक घटक आहे याचा विसर पडता कामा नये.

तमाशा हे मागील पिढीतील लोकांचे मनोरंजन करण्याचे एक साधन होते. प्रारंभी तमाशात शाहिरीने प्रवेश केला. राजे महाराजांचे मनोरंजन करणे हा हेतू असला तरी अधूनमधून जनतेला या कलेचा आस्वाद घेता येत असल्याने लोकांच्या मनात या कलेने गर केले. यात आणखीन एका कलेने भर घातली ती म्हणजे बतावणी होय! बात या शब्दाशी बतावणीचा संबंध असावा. मोघल साम्राज्यात बडी बडी बाते करण्यांना बादशहाच्या दरबारात मानाचे स्थान होते. किंबहुना बादशहाची मर्जी संपादन करण्याची एकप्रकारे स्पर्धा चाले. यालाच अतिशयोक्ती म्हणतात. समोर सत्य दिहत असूनही राजा, बादशहा जं बोलेल तेच अंतिम सत्य असे मानण्याची प्रथा लक्षात घेता, खुषमस्क-यांचा एक मोठा वर्ग कार्यरत होता. यात आणखी एका वर्गाची भर पडली, तो म्हणजे पुजारी वर्ग.

समाज या वर्गाच्या तालावर नाचत होता. लोकांच्या अज्ञानाचा फायदा उठवित या वर्गाने प्रचंड पिळवणूक केली. राजापेक्षा खुषमस्करी करणारेच हुशार असल्याच्या कथा लिहिल्या गेल्या. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, अकबर आणि बारबल यांच्यातील संवादाचे देता येईल. अकबराला काडीची अक्कल नसल्याचे अनेक दाखले दिले गेले आहेत. एका गुन्हेगाराला कडाक्याच्या थंडीत नदीत उभे करण्यात आल्यानंतरअकबराला प्रश्न पडतो ती व्यक्ती जिवंत कशी? त्यावर खुषमस्करे म्हणविणारे (आजच्या भाषेत चमचे) नदीच्या पलिकडे असलेल्या घरातील रात्रभर जळणा-या दिव्याच्या उष्णतेमुळे ती व्यक्ती जिवंत राहिली! गंमत अशी की अकबरही या गोष्टीवर विश्वास ठेवतो. आणि त्या व्यक्तीला अधिक कठोर शिक्षा करण्याचा आदेश देतो. या कथेतून अकबर बादशहाला स्वत:चे डोके नसलेली व्यक्ती या अर्थाने कथाकारांनी चित्र रंगविले असून, आजही त्यात कोणी बदल करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. थोडक्यात राजाला खूष केले की फायदा होतो हा प्रघात पडत गेला. अशा व्यक्ती नंर लोकांमध्ये स्वत:ची बढाई मारण्याचे काम करणे यात धन्यता मानत. यालाच बतावणी असे म्हटले जाते. कल्पनेच्याही पलिकडचे अर्थात लोकांना आश्चर्याचा धक्का देत, जागेवर खिळवून ठेवण्याचे काम हे कलाकार करत असतात. आणखीन वेगळ्या शब्दात सांगायचे तर फुशारकी मारणे हा शब्द अशांना चपखल बसतो! तमाशा या कलेत बतावणी या प्रकारात ओढूनताणून विनोद आणता येत नाही. अनेकदा समाजातील व्यंगावर बोट ठेवीत या माध्यमातून संदेश देण्याचे काम केले जाते. मध्यंतरी एका दूरदर्शन वाहिनीवर ” एक टप्पा आऊट ” हा विनोदी कार्यक्रम सादर करण्यात आला. यातील विनोदवीर असलेली ती व्यक्ति म्हणजेच एकपात्री प्रयोग सादर करणारी व्यक्ती विनोदाची जी पेरणी करत असते तो प्रकारही बतावणी या प्रकाराशी मिळताजुळताच आहे. फरक इतकाच की यात स्वत:ची बढाई कमी असते, बतावणीत मी या एका अक्षरा भोवती कथानक गुंफले जाते हा फरक आपण समजून घ्यायला हवा.
राजकीय स्तराची अवस्थाही अशीच काहीशी झालेली दिसते. पक्षप्रमुखांची मर्यादा सांभाळण्यासाठी त्यांचे चरण स्पर्श करण्याची कार्यकर्त्यांमध्ये किती स्पर्धा असते! आपल्यपेक्षा कितीही वयाने लहान असला तरी त्याच्या पायख पडण्यात धन्यता मनण्याची पद्धत फक्त भारतातच पाहवयास मिळते. याचे कारण पक्षातील त्या व्यक्तीचे स्थान! एकवेळ जन्मदात्याच्या चरणी लागणार नाहीत, पण नेत्याच्या दिवसातून शंभर वेळा पाया पडतील! याचे कारण मर्जी संपादन करणे हाच एक खटाटोप असतो. अनेक कार्यक्रमात मी निरीक्षण केले आहे. नेता कार्यक्रमाला आला की, हे समर्थक म्हणविणारे मध्येच तडमडणारच. नेता स्टेजवर गेला की, आयोजकांनी न बोलावताच ही मंडळी जाऊन बसतात. नियोजनाचा कसा फज्जा उडवायचा हे यांच्याकडून शिकावे!! कार्यक्रम सुरू असताना कोणत्या तरी कार्यकर्त्याच्या कानात नेत्याचे आणि आणि आपले कसे संबंध आहेत याची माहिती देताना असे तिखटमीठ लावून सांगतात की, ऐकणा-याच्या तोंडात हंगाम नसतानाही कैरीचा स्वाद घेतल्यागत पाणी सुटते! फोटो काढतांनाही आपण कसे दिसू याबाबतची ते घेत असलेली दक्षता दृष्ट लागण्यासारखी असते. चुकून दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली की बस्स, थांबण्याचे नाव नाही. स्तुतीपाठकाची भूमिका वठवित असे चित्र रंगविले जाते की, उद्याचा सूर्य नेत्याच्या आदेशाशिवाय उगवणारच नाही.
अशा स्तुतिपाठकाचा भरणा असलेल्या कार्यकर्त्यांमुळे प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळत नाही. तरीही पक्ष निष्ठा प्रमाण मानून नि:स्वार्थी भावनेने ही मंडळी काम करित असतात. पोस्टरवर, हॅण्डबीलमध्ये नाव असले काय नसले काय त्याने फरक पडत नाही अशा विचार करणारा कार्यकर्ता आता दुर्मिळ झाला आहे. याचे कारण तो पक्षाचे नियम पाळतो. आपल्यामुळे पक्षाला गालबोट लागणार नाही याची काळजी घेताना पक्षशिस्तीला व पक्षाच्या धोरणाला प्राधान्य देतो. याउलट हुज-यांचे असते. नेत्याच्या मागेपुढे केले की त्यांना आकाश ठेंगणे वाटू लागते. अशी मंडळी नेतृत्वाच्या आशिर्वादाने एखादे पद पदराय पाडून घेतात. पक्षालाही निवडणुकिसाठी उमेदवार हवा असतो. तोपर्यंत नेत्याच्या तालमीत तयार झालेले हे महाशय आपल्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र असे काही रंगवतात की, त्यांची गणना दुय्यम अर्थात दुस-या फळीतील नेत्यांमध्ये होते. मग रुबाब वाढतो. आधीची बतावणीची म्हणजेच नकलाकाराची भूमिका बाजूला पडते तिची जागा आश्वासित शब्द घेतात हा तो फरक आपल्या लक्षात येत नाही. पक्ष निवडणुकीत तिकिट देतो. काल तो पक्षासाठी बेंबीच्या देठापासून घोषणा देत होता, आज त्याच्या विजयासाठी पुढे आलेले समर्थक घोषणा देत असल्याचा बदल तो अनुभवीत असतो. अर्थात हे एकाएकी मिळालेले नाही. त्यासाठी प्रचंड धडपड असते. राजकारणाच्या चक्रव्युहाचा भेद करून स्वत:चा ठसा उमटविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते हे फक्त तोच जाणतो. तो आमदार बनतो. मंत्री बनतो. त्याचे वजन वाढते. पक्षातील स्थान मजबूत होते. अधूनमधछन तो प्रवक्त्याची भूमिकाही कजलेली असल्याने त्याने स्वत:चे समर्थक तयार केलेले असतात ते त्याचा शब्द खाली पडू देत नाहीत. आता खासदारकीचे डोहाळे लागल्याने पक्षावर कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर दबाव आणून तिकिटाची मागणी करतो. इथेच निष्ठेला घरघर लागते. त्याच्यातील ‘ इगो ‘ जागा होतो. मला नाही तर कोणालाच नाही. इगो अर्थात अहंकाराची जागा पक्षनिष्ठेला ठेच पोहचविण्याचे काम होत जाते. खरे तर हा दडलेला स्वार्थ असतो. पण तो बाहेर पडत नाही. त्यांना फक्त संधी हवी असते. एव्हाना समर्थकांनी पक्षातील मतभेद बाहेर चर्चा करून राजकारणाचा तमाशा करण्याचे काम पूर्ण केले असल्याने सत्ताधारी पक्षाच्या लक्षात येते. सत्ताधारी पक्षाला विरोधकात जेवढी फाटाफुट होईल तेवढे त्यांच्या पथ्यावर पडणारे असल्याने ़पडद्यामागून बोलणी होतात. त्याच्या पद्धतशीर बातम्या प्रसिद्ध करूश विरोधकांना धक्का दिला जातो.
वर वर्णन केल्याप्रमाणे भाजपने या धक्का तंत्राचा अतिशय खुबीने वापर केला आहे. या तंत्राची निर्मातीच काँग्रेस असून, भाजपने जशाचा तसा कित्त गिरविला एवढेच. आता प्रश्न आहे, काँग्रेसच्या तंबूत भाजपचा ऊंट शिरलाच कसा याचे उत्तर काँग्रेस-राष्ट्रवादीने शोधायचे आहे ही भाषा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची असून या आव्हनाचा सामना करण्याची ताकद या पक्षांमध्ये दिसत नाही असे काहीसे चित्र दिसते. ८० च्या दशकात भुतपूर्व प्रधाधमंत्री इंदिरा गांधी यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला होता. ही आदेशवजा घोषणा मुंबईसह देशभरात पोहचविण्याचे काम काँग्रेसने केले. रस्त्यालगतच्या भिंतींवर, बस स्टाॅप, रेल्वे स्थानकांवर सर्वत्र ” शिस्तीने राष्ट्र मोठे बनते. ” हे वाक्य नागरिकांचे लक्ष्य वेधून घेत असे. ही शिस्त गेली कोठे? काँग्रेस कधी नव्हे इतका बेशिस्त पक्ष का बनला? याची उत्तरे काँग्रेसवालेच देऊ शकतात. पक्षाला तिलांजली देण्याचे काम करणारे, दुसरा पक्ष काढणारे या अवनतीला जबाबदार आहेत. राजकारण हा गाढवांचा बाजार आहे असे कालपर्यंत आम्ही म्हणत होतो. पण आता आम्ही यात फरक करित आहोत. गाढव त्याच्या कामाशी प्रामाणिक असतं. जागतिक किर्तीचे तत्वज्ञ ‘ इमर्सन ‘ यांनी ” सातत्य हा गाढवाचा गुणधर्म आहे. ” या शब्दात गौरव केला असल्याने गाढवाच्या सातत्याचा गुण अंगी बाणवला असता तर आज हि वेळ आली नसती. मूळात राष्ट्रवादी पक्षाची निर्मितीने पक्षाला खिंडार पडले ते आजतागायत बुजविता आले नाही. शिस्तीचे तीन तेरा वाजले. पवारांनी काँग्रेसविरोधी उमेदवार उभे केले. पण मतांच्या विभागणीमुळे सत्तेसाठी एकत्र आले. खरेतर दोन्ही पक्ष एकमेकांना धोबीपछाड देत होते, पण सत्तेसाठी आघाडीत रुपांतर करुन, स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला गेला. या स्वार्थाला पुण्यातील सुरेश कलमाडी या नेत्याने राष्ट्रकूल स्पर्धेत घोटाळा करून, गालबोट लावले. हे गालबोट सर्वांनाच लागत गेले. अनेक खात्यात घोटाळे झाल्याच्या बातम्यांनी काँग्रेसची प्रतिमा मलिन होत गेली. बी. राजा यांचा स्पेक्ट्रम घोटाळा, खासदार कनीमोळी यांचे घोटाळ्याने थेट तिहार जेलमध्ये रवानगी झाली. यातून सावरायची संधीच मिळाली नाही. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून काँग्रेसने उरलीसुरली जनतेची सहानुभूतिही गमावून बसली. २३ मे २०१९.रोजी १७ व्या लोकसभेचे निकाल लागले. त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या झालेल्या दारुण पराभवानंतरही या पक्षातील धुरिणांना शहाणपण आल्याचे दिसत नाही. ज्यांनी काँग्रेसच्या सत्ताकाळात सुखे भोगली.पद, पैसा, प्रतिष्ठा मिळविली ते आज स्वत:च्या स्वर्थासाठी सत्ताधारी पक्षाच्या वळचणीखाली उभे राहण्यात धन्यता मानत आहेत. नागपुरातील संघाचे रेशीमबागेतील मुख्य कार्यालयाखाली पागोळ्यात भिजण्याचा आनंद लुटण्यात धन्यता मानणारी अनेक मंडळी आहेत. या पागोळ्यातून ठिबकणारा प्रत्येक थेंब हिंदुत्वाचा आहे याची पूर्ण कल्पना असल्याने त्यांनी घेतलेली एक्झीट त्यांच्यादृष्टीने योग्यच आहे. कदाचित काँग्रेसमध्ये राहून त्यांची घुसमट होत असल्याने ते स्वगृही परतले हे एकप्रकारे बरेच झाले म्हणायचे. काँग्रेसमधील छुपी जातीवादी मानसिकता स्वत:हून बाहेर पडली या सारखा दुसरा आनंद नाही. राधाकृष्ण विखेपाटील, विजयसिंह मोहितेपाटील, आता पद्मसिंस पाटील पितापुत्रही त्याच वाटेवर असल्याने पाटलाची पलटण ‘ कदम ताल ‘ करित भाजपच्या राहुटीत दाखल होत आहे. या वाटचालीचे पडसाद जनतेत उमटत असून, उदयनराजे -छगन भुजबळांपासून सारी मंडळी जनतेच्या निरीक्षणाखाली आहेत. त्यांच्या जाण्याने काँग्रेसने खरेतर एक दिवसाचे सुतक पाळायला हवे. जे गेले त्यांनी विश्वासघात केला असून, ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी ठेवली त्यांनीच दगा दिला ही भावना प्रत्येकाच्या चेह-यावर दिसते. त्यामुळेच आम्हाला जनतेच्या काळजाला भिडणारे १९६४ साली रूपेरी पडद्यावर गाजलेल्या ‘ संगम ‘ या चित्रपटातील “दोस्त दोस्त ना रहा……” या मुकेश यांच्या आवाजातील दर्दभ-या गीताची आठवण झाली.
-गुणाजी काजिर्डेकर,
चेंबूर, मुंबई-४०० ०७१
रविवार, दिनांक १ सप्टेंबर २०१९ रोजी
(उपरोक्त लेखक दै विश्वपथ या मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रकाचे कार्यकारी संपादक आहेत.

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न

रवि सप्टेंबर 1 , 2019
Tweet it Pin it Email वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मुंबई ( प्रतिनिधी ) :- महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा झंझावात आणि सर्व समाज घटकांचा प्रतिसाद पाहता आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व संलग्न सामाजिक संस्था, संघटना, मंडळे, तालुका शाखा, समन्वय समिती […]

YOU MAY LIKE ..