पहिली महाड परिषद…..!

पहिली महाड परिषद…!

चळवळीच्या सुरूवातीपासून ते १९२७ पर्यंत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे घाटमाथ्यावरच चळवळीचे कार्य करीत होते. जवळजवळ २५ वर्षे ते कोकणात उतरले नव्हते. ‘मूकनायक’ साप्ताहिकाचा प्रश्न असो, साऊथबरो कमिटीपुढे निवेदन घ्यावयाचा प्रश्न असो, बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापण्याचा प्रश्न असो, समाज समता संघाचा प्रश्न असो, वसतिगृहे चालवण्याचा प्रश्न असो, अगर जिल्ह्याजिल्ह्यामध्ये परिषदा घेण्याचा प्रश्न असो, घाटमाथ्यावरील निरनिराळ्या जिल्ह्यांतून त्यांनी आपली चळवळ चालविली होती. १९२७ पूर्वी निरनिराळ्या जिल्ह्यात ज्या अनेक परिषदा झाल्या होत्या, त्या घाटमाथ्यावर. म्हणून पहिल्यांदा ते कोकणात उतरले ते १९२७ साली. महाडच्या पहिल्या परिषदेच्या वेळी, ता.१९ व २० मार्च १९२७ रोजी. तीच ‘कुलाबा (आजचा रायगड) जिल्हा बहिष्कृत परिषद.’ घाटमाथ्यावरील परिषदाही बहिष्कृत हितकारिणी सभेच्या वतीनेच भरविण्यात आल्या होत्या. म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीच्या या परिषदा होत्या. त्यांनी पूर्वीची कोणाची चळवळ चालविली होती असे नव्हे. असा छुपा प्रचार करणारे काही अघांतुक लोक आहेत.


ते चुकीचे आहेत यात शंका नको. महाड परिषदेसाठी अगोदरच कित्येक दिवस वाटाघाटी चाललेल्या होत्या. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी परिषदेच्या तारखा ठरविण्यास लवकर संमती दिलेली नव्हती. म्हणून महाड परिषद लांबणीवर पडली होती. मात्र इतर परिषदेपेक्षा महाडच्या दोन परिषदा निराळ्या स्वरुपाच्या होत्या. त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या नेतृत्वातील पल्लेदारपणा व मुरब्बीपणा सतत वाढत असल्यामुळे त्या परिषदांना पल्लेदारपणाची व मुरब्बीपणाची चालना मिळाली होती.

महाड मुंबईपासून १७० किमी. अंतरावर असून मुंबई-गोवा रोड महाड शहरामधूनच त्यावेळी जात होता. महाड पासून जवळच रायगड किल्ला आहे.

महाडच्या पश्चिमेस बौद्ध लेण्या आहेत. महाडला दोन परिषदा झाल्या. एक १९ व २० मार्च १९२७ रोजी व दुसरी २५-२६ डिसेंबर १९२७ रोजी. पहिल्या परिषदेतून दुसरी परिषद उद्भवली. दुसरी परिषद

हिंदू_समाजाच्या पुनर्रचनेचा_विषय हाताळण्याइतकी व्यापक करण्यात आली होती.

पहिल्या परिषदेसाठी मुंबईहून बाबासाहेबांच्या बरोबर शिवतरकर, सहस्त्रबुद्धे, भाई चित्रे, बाळाराम आंबेडकर, मडकेबुवा (गणपत जाधव), रेवजीबुवा डोळस; नाशिकहून भाऊराव गायकवाड, पुण्याहून राजभोज इत्यादी कार्यकर्ते महाडला गेले होते. पहिल्या परिषदेला जागाही मिळणे मुश्किल झाल्याने महाडच्या गाडी तळावरील बांबू-तट्टयांचे तमाशाचे थिएटर घ्यावे लागले. तेथे अस्पृश्य बांधवांची अलोट गर्दी होती. धोतर-शर्ट व कोट परिधान केलेले तेजस्वी, गोरेपान व रूबाबदार असे दिसणारे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर कोकणभूमीच्या महाडच्या विचारपीठावर आले तेव्हा हजारो लोकांनी आपल्या हातातील काठ्या एकाचवेळी उंच करुन त्यांना मानवंदना केली.

हे दृश्य विलोभनीय होते. असे दृश्य यापूर्वी पाहावयास मिळाले नव्हते. बाबासाहेब पिंडाने लोकशाहीवादी असल्याने महाड परिषदेचे अध्यक्षस्थान त्यांच्या ऐवजी इतर कोणीही स्वीकारावे असे त्यांनी सुचविले होते. परंतु आग्रहाखातर त्यांनी मान्यता दिली, असे त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सां
गितले.

सरकारी नोकऱ्यांत जास्तीतजास्त शिरकाव करून घ्यावा. आचार, विचार व उच्चार शुध्द ठेवावेत. शेतीसारखा धंदा करावा, शिळे तुकडे खाण्याचे बंद करावे. घाटावर अनेक परिषदा झाल्या आहेत. तेव्हा जागृतीचा अग्नी विझू देऊ नये. असा बाबासाहेबांनी उपदेश केला.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी १४ ठराव पास करण्यात आले. त्यात अस्पृश्य समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक उन्नतीबाबतचे व सरकारी नोकऱ्यांबाबतचे ठराव होते. त्यापैकी एका महत्त्वाच्या ठरावाचे दोन भाग महाड प्रकरणासंबंधी खास महत्त्वाचे असल्याने ते खाली दिलेले आहेत.
“बहिष्कृत वर्गातील लोक सार्वजनिक स्थळे व पाणवठे यांचा उपयोग करुन आपले नागरिकत्वाचे हक्क बजावण्याचा प्रयत्न करीत असताना वरिष्ठ वर्गातील लोक त्यांच्याशी सर्व प्रकारचे व्यवहार बंद करून हरताळ जाहीर करतात; तसे न करता, अशा वेळी वरिष्ठ वर्गातील लोकांनी बहिष्कृत लोकांना साहाय्य करावे.”
” जातीभेद मोडण्याचा उपाय म्हणून, मिश्र_विवाह पध्दतीचा प्रघात सुरु करावा.”


वरील ठरावातील मागणी साधी व सरळ होती. सार्वजनिक व खाजगीही ठिकाणी अस्पृश्यांना जाता आले नाही तर त्यांनी आपल्या जीवनाचा व्यवहार करावयाचा तरी कसा? आणि जातीभेद मोडायचा असेल तर मिश्र विवाहाशिवाय तो भेद मोडणार कसा? या दृष्टिकोनातून वरील दोन्ही ठराव सरळच होते.
अशा सरळ ठरावांना देखील उच्चवर्गीय हिंदूंनी मान्यता देण्याचा चांगुलपणा दाखविला नाही. त्यामुळे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे अनुयायी वरील ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी शिस्तबद्धपणे व शांततेने चवदार तळ्यावर पाणी पिण्यास गेले व परतले. त्यानंतर सवर्ण हिंदूंनी अस्पृश्य लोकांवर ठिकठिकाणी हल्ले केले व रक्तपात घडविला.

महाडचा दंगा धर्मसंगर होता अशी बाबासाहेबांनी छाननी केली व त्यांच्या हिंदू धर्म त्यागाची बीजे महाडच्या दंग्यात पेरली गेली. अस्पृश्यांवर पडलेला एकेक वार हिंदू समाजावर व भारतावरच पडलेला होता.
या घटना घडल्यामुळे बाबासाहेबांवर झालेला परिणाम काही अभूतपूर्वच होता. यावेळी बाबासाहेबांचे व्यक्तीमत्व जसे कसास लागले त्याप्रमाणे ते एखाद्या योध्द्याच्या निर्भयतेला लाजवणारे होते. बाबासाहेबांच्या ऐवजी त्या ठिकाणी दुसरा कोणताही पुढारी असता तर त्याने दंगलीला उत्तर म्हणून दुसरे काही भलतेच सुचविले असते. स्वबांधवांवर झालेल्या अत्याचारामुळे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर इतके व्यथित झाले की, त्यांचा बंदोबस्त म्हणून त्यांनी तीन महत्त्वाच्या गोष्टी केल्या. त्यापैकी पहिली त्वरित गोष्ट केली ती, गुंडगिरी करणाऱ्यांवर फिर्याद गुदरली. दुसरी गोष्ट ही की, अशा प्रकरणामध्ये वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंची जबाबदारी काय, सरकारची जबाबदारी काय व अस्पृश्य समाजाचेही कर्तव्य काय? इत्यादी बाबतीत लेख लिहून त्यांनी तीनही प्रकारच्या लोकांना अतिशय मूलभूत असे मार्गदर्शन केले आहे. तिसरी महत्वाची गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे, सवर्ण हिंदू असा दंगा का करतात!

अस्पृश्यांचा विटाळ का मानतात, या विषयामध्ये ते इतके खोलवर गेले आहेत की त्यांनी हिंदुशास्त्रांचीच चांगली झडती घेतली आहे. जगात असे खरे धर्मकार्य कोणीही केलेले आढळणार नाही. एवढ्या व अशा कळकळीचा पुढारी जगामध्ये मिळणे अशक्यप्राय आहे.
चवदार तळ्यावर डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी व त्यांच्या अनुयायांनी पाणी प्यायल्यामुळे त्या तळ्याचे शुद्धीकरण करण्यात आले हे समजताच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जबरदस्त दुखावले गेले. एम.ए., पी.एच.डी., डी.एस.सी., बॅर.अॅट.लाॅ या पदव्या धारण करणारे; आधुनिक समाजरचनेचा अभ्यास करणारे, भारत राष्ट्र आहे की नाही, याचा ठाव घेणारे व निरनिराळ्या धर्माचा अभ्यास करुन त्यामधील धर्म अधर्म सांगणारे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर किती #उच्च_दर्जाच्या #सुसंस्कृत_मनाचे होते, याची कल्पना रानटी वृत्तीच्या व संस्कृतीशून्य अशा लोकांना व गाईच्या मलमूत्राने तळ्याचे शुद्धीकरण करणाऱ्या अमानुषांना कशी येणार?

संकलन,
S.P.Talvatkar®✍
क्रांतीभूमी महाड
www.ambedkaree.com

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

53 जातींना बुद्धाची ओढ !

शनी मार्च 21 , 2020
Tweet it Pin it Email जनगणना 2011 – 53 जातींना बुद्धाची ओढ ! **************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com Pin it Email https://www.ambedkaree.com/first-mahad-parishad-fight-for-water-dr-ambedkar/#SU1HXzIwMjAwMzI ●●●●●●●●●●●●●●●●●● 2011 सालात झालेली मागची जनगणना काय सांगते? राज्यातील 59 अनुसूचित जातींपैकी चक्क 53 जातींना बुद्धाचीच ओढ लागल्याचे त्या जनगणनेतून स्पष्ट झाले आहे। धम्मक्रांतीचे चक्र गतिमान होण्याच्यादृष्टीने […]

YOU MAY LIKE ..